शिक्षकांच्या साहित्यिक अभिव्यक्तीचा उत्सव १७ मार्चला तिसरे शिक्षक साहित्य संमेलन

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी): शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेचा कणा मानला जातो. या कण्याला अधिक सक्षम, विचारसमृद्ध आणि संवेदनशील बनविण्यासाठी शिक्षकांच्या साहित्यिक अभिव्यक्तीला व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. याच उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या शिक्षक साहित्य संमेलनात जिल्ह्यातील शिक्षक साहित्यिकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळणार असल्याचे मत संमेलनाच्या स्वागताध्यक्ष तथा शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी व्यक्त केले.

जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या कार्यालयात आयोजित नियोजन बैठकीत शिक्षक साहित्यिकांना मार्गदर्शन करत होत्या. येत्या १७ मार्च रोजी एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथील मंथन सभागृहात हे संमेलन संपन्न होणार आहे. या बैठकीत संमेलनासाठी विविध समित्यांची स्थापना, कार्यवाटप तसेच कार्यक्रमाच्या आराखड्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना लाठकर यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या माध्यमातून शिक्षकांच्या सर्वांगीण समृद्धीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून
त्याला पुढेही सातत्य दिले जाईल. या संमेलनात ग्रंथदिंडी, उद्घाटन समारंभ, चित्रप्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन, परिसंवाद, कथाकथन, निमंत्रितांचे कवी संमेलन आणि समारोप अशा विविध साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

तसेच समृद्ध वारसा शिक्षकांची लेखणी छत्रपती संभाजीनगरची कहाणी या शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशावर आधारित संपादित ग्रंथाचे प्रकाशनही या संमेलनात होणार आहे. या साहित्य संमेलनात जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. बैठकीस लाठकर, एस. पवार, एस. सावळे, जे. चौरे, आर. ठाकूर, के. पदकोंडे, डी. शिरसाठ, डॉ व्हि. तायडे, मनिषा वासिंबे, डॉ. एस. गायकवाड, हबीब भंडारे, आशा डांगे, संतोष तांबे, सुनील डोके, बी. जी. गायकवाड, केदार, संदीप ढाकणे, गिरीश जोशी, मुळे, एस. काळगे, व्हि. दीक्षित, एस. गवई, व्हि. कंकाळ, बी. शिंदे, शिवाजी काकडे, व्हि. साबदे, अलका घोडने, रायभान जाधव, सुनील दवंगे, सुनीता वाघ, वर्षा गायकवाड आदींची उपस्थिती होती.